Eknath Shinde: गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य करत राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘जागतिक बांबू लागवड दिना’चे औचित्य साधून आपल्या शेतात बांबूची रोपटी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण कुठल्याही कारणामुळे नाराज नसून सण-उत्सवासाठी गावी आलो आहोत. मात्र, आपण गावी आलो, दिल्लीला गेलो किंवा लंडन दौऱ्यावर निघालो, तरी काही लोकांच्या पोटात विनाकारण दुखू लागते. विरोधकांच्या या विनाकारण होणाऱ्या पोटदुखीवर जमाल गोटा देणे किंवा त्यावर औषधी वनस्पती शोधून लागवड करणे हाच एकमेव पर्याय असल्याची उपरोधात्मक टिप्पणी त्यांनी केली. आपण कोणत्याही टीकेला शाब्दिक उत्तर न देता थेट आपल्या कामातूनच विरोधकांना प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतीतील नवनवीन प्रयोग आणि बांबू लागवडीचे महत्त्व
दरे येथील आपल्या शेतीत नवनवीन कृषी प्रयोग करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी यावेळी बांबू शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. बांबूचा वापर केवळ पारंपरिक कामांपुरता मर्यादित नसून त्यापासून इथेनॉल निर्मिती, विमानतळांचे अंतर्गत सुशोभीकरण आणि अनेक औद्योगिक वस्तू बनवता येतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळले पाहिजे असे ते म्हणाले. यापूर्वी आपल्या शेतात सफरचंद आणि ब्ल्यूबेरीचे यशस्वी प्रयोग केल्यानंतर, आता त्यांनी कापूर आणि हिंग या दोन दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली आहे.
Eknath Shinde Live । दरे,सातारा पत्रकारांशी संवाद – लाईव्ह https://t.co/tjpqs66ll4 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 18, 2026
दुष्काळसदृश परिस्थितीवर सरकारची नजर
राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या पावसाच्या तूट आणि दुष्काळसदृश परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आपण स्वतः लवकरच बाधित भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.