Pune News : पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठाची विद्यार्थिनी संपदा बडे हिने आपल्या शुल्काबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. तिची फी आणि स्कॉलरशिपबाबतची विधाने राजकीय फायद्यासाठी तोडून-मोडून सादर केली जात असल्याचे सांगत, तिचा व तिच्या परिस्थितीचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये, असे ठाम आवाहन तिने एका निवेदनाद्वारे केले आहे. तसेच तिने राहुल गांधींनी भेट घेण्यासाठी दिलेलं आमंत्रणही नाकारलं आहे.
दबावाखाली येऊन चुकीची माहिती दिल्याचा खुलासा
ऑगस्ट 2026 मध्ये महाविद्यालयातील शुल्कवाढ आणि स्कॉलरशिपच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता, ज्यानंतर संपदाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर स्पष्टीकरण देताना संपदाने सांगितले की, त्या वेळी निर्माण झालेल्या प्रचंड दबावापोटी तिने कॉलेजच्या शुल्काबद्दल माध्यमांसमोर चुकीची माहिती दिली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात तिने प्रथम वर्षासाठी 9,760 रुपये आणि द्वितीय वर्षासाठी 3,760 रुपये इतकीच फी भरली आहे. मात्र, राजकीय वातावरणामुळे तिच्यावर दबाव आणून ज्यादा फी आकारली जात असल्याचे विधान वदवून घेण्यात आले होते.
महाविद्यालय आवारात राडा आणि पोलीस बंदोबस्त
या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात आणि वसतिगृहाजवळ एनएसयूआय (NSUI), काँग्रेस आणि अभाविप (ABVP) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र खटके उडाले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि राडा झाल्यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला तात्काळ हस्तक्षेप करावा लागला आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी महाविद्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आपल्याबाबत सुरू असलेल्या या सर्व वादावर पडदा टाकताना संपदाने स्पष्ट केले की, तिने दिलेली खरी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे राजकीय संघटनांनी या विषयाचे भांडवल करणे थांबवावे आणि विद्यार्थ्यांना शांततेने अभ्यास करू द्यावा.