Nitesh Rane: भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांना 2019 च्या बहुचर्चित ‘चिखलफेक’ प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी (कलम 504) न्यायालयाने त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या प्रकरणातील गंभीर आरोपांतून त्यांची आणि त्यांच्या 40 समर्थकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे चिखलफेक प्रकरण?
जुलै 2019 मध्ये, जेव्हा नितेश राणे काँग्रेसमध्ये होते, तेव्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा तापला होता. कणकवली येथे पाहणी दरम्यान, संतप्त झालेल्या नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर शेडेकर यांच्या तक्रारीवरून राणेंवर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि धमकी देणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाचा निकाल आणि कायदेशीर दिलासा
जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. कलम 353 (सरकारी कामात अडथळा) आणि 332 (मारहाण) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतून पुराव्याअभावी राणे आणि त्यांच्या 40 सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तथापी, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून शिवीगाळ केल्याबद्दल (कलम 504) नितेश राणे यांना दोषी धरण्यात आले. या गुन्ह्यासाठी त्यांना 1 महिना कारावास आणि 1 लाखाचा दंड सुनावला.
हेही वाचा – मोठी बातमी! मराठी सक्तीवर रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा की इशारा? प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं…
शिक्षेला तात्काळ स्थगिती आणि पुढील पाऊल
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी या निकालाला स्थगिती देण्याची विनंती केली. उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने या शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना सध्या तरी तुरुंगात जावे लागणार नाही. त्यांचे वकील लवकरच या निकालाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहेत. राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा रंगली आहे.