Vehicle Sales Record: देशात वाढती महागाई आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमती असूनही, मे 2026 या महिन्यात भारतीय ग्राहकांनी कार आणि दुचाकी वाहनांची बंपर खरेदी करत नवा इतिहास रचला आहे. वाहन विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना 'फाडा' (FADA) ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे 2026 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एकूण 25,31,067 वाहनांची किरकोळ विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 23,10,451 इतका होता, म्हणजेच वाहन उद्योगाने वर्ष-दर-वर्ष तुलनेत 9.55 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली आहे. यामध्ये सर्वात मोठी झेप कार आणि प्रवासी वाहनांच्या विभागात दिसून आली असून, कारची विक्री मागील वर्षीच्या 3,26,656 युनिट्सवरून तब्बल 23.25 टक्क्यांनी वाढून 4,02,591 युनिट्सवर पोहोचली आहे.
ग्रामीण भागातील समृद्धीमुळे दुचाकींचा धुमाकूळ; ई-बाईक्सचा टक्का वाढला
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या दुचाकी (बाईक्स आणि स्कूटर्स) विभागानेही मे महिन्यात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात विकल्या गेलेल्या 17,15,581 दुचाकींच्या तुलनेत यंदा 7.54 टक्क्यांच्या वाढीसह एकूण 18,44,947 वाहने ग्राहकांनी घरी नेली. लग्नसराईचा हंगाम, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पन्न आणि मायलेज देणाऱ्या गाड्यांची मागणी ही या विक्रमी विक्रीमागील मुख्य कारणे आहेत. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकींनाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली असून, त्यांचा बाजारहिस्सा 6.11 टक्क्यांवरून थेट 9.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पायाभूत सुविधांचा विकास ठरला पूरक
केवळ वैयक्तिक वाहनेच नव्हे, तर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असलेल्या व्यावसायिक आणि मालवाहू वाहनांच्या विक्रीतही सकारात्मक वाढ झाली आहे. देशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि मालवाहतूक जोरात सुरू असल्याचे संकेत देत व्यावसायिक वाहनांची विक्री 5.29 टक्क्यांनी वाढून 83,823 युनिट्सवर गेली आहे. याचसोबत रिक्षा आणि तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत 3.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, हा आकडा 1,11,526 युनिट्सवर पोहोचला आहे.
हेही वाचा – Gold- Silver Price Today: बाजार उघडताच मोठा उलटफेर! सोन्याला जबरदस्त ब्रेक, चांदी 6 हजारांनी घसरली
उष्णतेची लाट आणि जागतिक आव्हानांनंतरही जून महिन्यासाठी सकारात्मक अंदाज
'फाडा'चे अध्यक्ष सी. एस. विग्नेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि देशातील वाढत्या तापमानासारख्या आव्हानांचा सामना करत भारतीय वाहन बाजाराने आपली ताकद दाखवून दिली आहे. आगामी जून महिन्यासाठी देशातील जवळपास 50 टक्के वाहन विक्रेते अत्यंत उत्साही आणि सकारात्मक आहेत. आगामी काळात मान्सूनचे वेळेवर होणारे आगमन, खरिपाची पेरणी आणि ग्रामीण भागातील पैशांची उपलब्धता यामुळे वाहनांची ही घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त केला जात आहे.