Corporators Suspended: पक्षशिस्तीचे उल्लंघन करून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या आपल्याच नगरसेवकांना काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. जालना महानगरपालिकेत भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने एकाच वेळी 7 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
जालना महापालिकेच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेत काँग्रेसच्या या सात नगरसेवकांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि अधिकृत ‘व्हीप’ (पक्षादेश) धाब्यावर बसवला. त्यांनी उघडपणे भाजपच्या उमेदवारांना मतदान करत सहकार्य केल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
निलंबनाची कारवाई झालेले सदस्य:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने खालील सदस्यांवर निलंबनाचे आदेश बजावण्यात आले आहेत:
फारूक सादीक तुंडीवाले
इमरान खान आमानुलला खान
फरहाना अ. रऊफ अंसारी
सुनील अशोक बोरडे
मयूरी दिनेश देने
रुबीना मजीद पठाण
अनिल अशोक तिरुखे
पक्षांतर्गत बंडाळीला चपराक
काँग्रेसने यापूर्वी अंबरनाथमध्येही अशाच प्रकारची कारवाई केली होती. आता जालन्यातील या कारवाईच्या माध्यमातून राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनाही ‘पक्षाशी गद्दारी केल्यास गय केली जाणार नाही’, असा कडक इशारा देण्यात आला आहे. पक्षातून निलंबित झालेल्या या सातही नगरसेवकांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी काय असेल? ते आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार की अपक्ष म्हणून आपली भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.