बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस पक्षानेही आपला उमेदवार जाहीर करत निवडणुकीत रंगत आणली आहे. काँग्रेसकडून ॲड. आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून बारामतीच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत.
ॲड. आकाश मोरे हे माजी आमदार ॲड. विजय मोरे यांचे सुपुत्र असून त्यांची राजकीय पार्श्वभूमी भक्कम मानली जाते. विजय मोरे यांनी 1978 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे मोरे कुटुंबाचा बारामतीच्या राजकारणात जुना संबंध असल्याचे पाहायला मिळते.
ॲड. आकाश मोरे यांनी यापूर्वीही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा ते बारामतीच्या रणांगणात उतरल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी देत धनगर समाजाचा विचार केल्याचे दिसून येत आहे. ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा राजकीय डाव असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत विविध पक्ष आणि नेत्यांची ताकद कसोटीला लागणार आहे. बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघात ही लढत कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.