नुकत्याच नागपूर येथील महारेरा मुख्यालयात, मुंबई मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या विशेष खुल्या सत्रात विकासकांकडून सादर करण्यात आलेली सर्व 37 गृहनिर्माण प्रकल्पांची प्रकरणे जागेवरच मार्गी लावण्यात आली आहेत. ही सर्व प्रकरणे गृहनिर्माण प्रकल्पांच्या मुदतवाढीची प्रकारणे होती. प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता होत नसल्याने त्यांना मंजुरी मिळू शकलेली नव्हती. या विशेष सत्रामुळे त्रुटींची पूर्तता झाल्याने तातडीने मंजुरी मिळण्यास मदत झालेली आहे.
या विशेष सत्राला मुख्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसोबतच नागपूर महारेरा कार्यालयाचे उपसचिव, 37 प्रकल्पांचे विकासक, त्यांचे प्रतिनिधी, विकासकांच्या नरेडको, क्रीडाइ या स्वयंविनियामक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी करताना विकासक सदस्य असलेल्या स्वयंविनियामक संस्थांच्या तज्ञाची त्यांना मदत होत असली, तरी विकासकांना पुरेशा माहिती अभावी अडचणींना सामोरे जावे लागते.
हे प्रकल्प मार्गी लागावे यासाठी मुख्यालयात ज्या पद्धतीने खुले सत्र आयोजित करण्यात येते त्याच धर्तीवर नागपूर येथे आयोजित व्हावे अशी विकासकांची मागणी होती. म्हणून, महारेराने नागपूर येथे दुसऱ्यांदा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीशी संबंधित मुख्यालयातील न्यायिक, आर्थिक आणि तांत्रिक विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे खुले सत्र आयोजित केले होते. महारेराचे माध्यम सल्लागार राम दोतोंडे यांनी ही माहिती दिली आहे.