Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला प्रचंड मोठ्या राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत पक्षाशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. त्यांच्यापाठोपाठ तृणमूलच्या आणखी एक राज्यसभा खासदार कोयल मल्लिक या देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आगामी राज्यसभा निवडणुका अवघ्या 10 दिवसांवर आलेल्या असतानाच या दोन्ही बड्या नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुखेंदू शेखर यांनी यापूर्वीच टीएमसीमधील अनेक खासदार पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते, जे आता स्वतःच्या राजीनाम्याने त्यांनी खरे करून दाखवले आहे.
टीएमसीचे संख्याबळ घटले; एप्रिल 2032 पर्यंत होता कार्यकाळ
या दोन प्रमुख खासदारांच्या अचानक जाण्यामुळे राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ आता 13 वरून थेट 11 वर घसरणार आहे. अभिनेत्री आणि नेत्या कोयल मल्लिक यांना पक्षाने नुकतेच राज्यसभेत पाठवले होते आणि त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2032 पर्यंत शिल्लक होता. दुसरीकडे, सुखेंदू शेखर रॉय यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2029 पर्यंत होता. या महत्त्वाच्या नेत्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने तृणमूल काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पोटनिवडणुकीत भाजपची ताकद वाढणार; 'क्रॉस व्होटिंग'ची टांगती तलवार
या रिक्त झालेल्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाला (BJP) थेट फायदा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 हून अधिक जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर सत्ताधारी टीएमसीला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले होते. या संख्याबळाच्या जोरावर भाजप राज्यसभेच्या या दोन्ही जागा सहज खिशात घालू शकते. त्यातच तृणमूलच्या विधिमंडळ पक्षात मोठी फूट पडली असल्याने, आगामी निवडणुकीत पक्षादेशाविरुद्ध 'क्रॉस व्होटिंग' होण्याची भीतीही वर्तवली जात आहे.
काकोली घोष यांचा राजीनामा आणि 57 आमदारांचे थेट बंड
तृणमूल काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह केवळ राज्यसभेपूरता मर्यादित नसून तो लोकसभेतही पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा त्याग केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी पक्षाचेच दुसरे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि अपमानास्पद वर्तनाचे आरोप केले आहेत. यासोबतच, टीएमसीच्या तब्बल 57 आमदारांनी यापूर्वीच उघड बंड पुकारले असून विधानसभेत स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आहे. ममता बॅनर्जी यांनी सुचवलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावाचा विरोध करत या बंडखोर आमदारांनी रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे, ज्यामुळे ममता बॅनर्जी यांची पक्षावरील पकड सैल झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.