Adulterated Milk: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भेसळयुक्त दुधाच्या सेवनामुळे आतापर्यंत 13 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, अद्याप 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. राजमहेंद्रवरम येथील रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या भीषण घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून दूध डेअरीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पहिले रुग्ण 22 फेब्रुवारी रोजी आढळले होते. लालाचेरुवु परिसरातील चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगर येथील अनेक वृद्धांना अचानक अतिसार, उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. रुग्णांची प्रकृती वेगाने बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासाअंती समोर आले की, या सर्व बाधित लोकांनी एकाच ठिकाणाहून दूध खरेदी केले होते. रक्ताच्या तपासणीत युरिया आणि सीरम क्रिएटिनिनचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसून आले, जे शरीरातील विषबाधेचे स्पष्ट संकेत आहेत.
वरलक्ष्मी दूध डेअरीतून विषारी पुरवठा
प्राथमिक तपासात कोरुकोंडा मंडळाच्या नरसापुरम येथील 'वरलक्ष्मी दूध डेअरी' मधून या दुधाचा पुरवठा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या डेअरीतून एकूण 106 कुटुंबांना दुधाचा पुरवठा केला जात होता. तज्ञांच्या मते, दुधामध्ये करण्यात आलेली घातक भेसळच या मृत्यूंना कारणीभूत ठरली आहे. प्रशासनाने तातडीने या डेअरीवर धाड टाकून दुधाचे नमुने जप्त केले असून डेअरी पूर्णपणे सील करण्यात आली आहे.
दूध विक्रेता ताब्यात; पोलिसांकडून गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 33 वर्षीय संशयित दूध विक्रेता अडला गणेशेश्वर राव याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, बाधितांच्या मदतीसाठी परिसरात आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. देशभरात भेसळयुक्त दुधाच्या तक्रारी वाढत असतानाच घडलेल्या या घटनेने अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.