मुंबई: मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाने आज एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला. नायगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पहिल्या टप्प्यातील 864 सदनिकांचे वाटप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. तब्बल चार दशकांची प्रतीक्षा, न्यायालयीन लढा आणि अनेक तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर, आज जेव्हा रहिवाशांच्या हातात घराची चावी पडली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू या प्रकल्पाच्या यशाची साक्ष देत होते. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पाच पुनर्वसन इमारतींचे काम पूर्ण झाले असून, त्यातील 864 पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, या वाटपात मुंबईच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस विभागाचा मोठा वाटा आहे. एकूण सदनिकांपैकी 423 घरे ही निवृत्त पोलीस कर्मचारी, त्यांचे वारस आणि सध्या कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. अनेक दशके 10 बाय 15 च्या खोल्यांत आयुष्य व्यतीत करणाऱ्या या कुटुंबांसाठी हे केवळ घराचे हस्तांतरण नसून, त्यांच्या जीवनमानाचा ‘कायापालट’ करणारा क्षण ठरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांच्या भाषणात प्रकल्पाच्या संघर्षाचा पट मांडला. “हा विषय गेल्या 40 वर्षांपासून रेंगाळत होता. 2014 मध्ये जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा हा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला,” असे ते म्हणाले. खाजगी विकासकांच्या (बिल्डर्स) भरवशावर राहिलो असतो, तर हा प्रकल्प कधीच पूर्ण झाला नसता, हे ओळखून राज्य सरकारने ‘म्हाडा’च्या माध्यमातून स्वतः हा प्रकल्प राबवण्याचा धाडसी निर्णय घेतला. बिल्डर लॉबीचे हितसंबंध आणि लोकांच्या मनात पसरवलेले संभ्रम दूर करत, शासनावर विश्वास ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांचे मनापासून आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 'डॉ. बाबासाहेब आंबडेकर बीडीडी संकुला'तील 14 सदनिकांची चावी व ताबापत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केले. सदनिकांचे… pic.twitter.com/Dr8zncz6ks — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2026
कामाचा दर्जा आणि पारदर्शकता जपण्यासाठी टाटा आणि एल अँड टी सारख्या देशातील नामवंत कंपन्यांना या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. “उत्तम दर्जाचे बांधकाम आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा हेच आमचे उद्दिष्ट होते,” असे फडणवीस यांनी नमूद केले.
नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या जीवनातील सुवर्णक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला'तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14… pic.twitter.com/WX2CC3eMRM — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2026
मध्यंतरीच्या काळात आलेल्या प्रशासकीय अडचणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत वेगाने दूर केल्या. त्यामुळेच आज नायगावमध्ये या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून, वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील कामांनाही आता मोठी गती मिळाली आहे. बीडीडी चाळीतील हे पुनर्वसन केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम नसून, मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचा या शहरावरचा अधिकार अधिक घट्ट करणारा हा ‘स्वाभिमान सोहळा’ ठरला आहे.
येत्या काळात वर्षातून किमान दोन वेळा अशा पद्धतीने तयार घरांच्या चाव्यांचे वाटप करण्याचे आश्वासन देत, सरकारने मुंबईच्या पुनर्विकासाला एक नवीन ‘रोडमॅप’ दिला आहे. जुन्या मुंबईची ओळख असलेल्या चाळ संस्कृतीला आधुनिकतेची जोड देताना, रहिवाशांना त्याच ठिकाणी सामावून घेण्याचा हा ‘मुंबई मॉडेल’ प्रकल्प भविष्यात इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.