नाशिकमधील स्वंयघोषित भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी एसआयटीकडून सुरू असून तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून आरोपी कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ, तसेच खरातच्या घराच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत राजकीय नेते किंवा त्यांच्या पत्नी या भोंदूगिरीच्या नादाला लागल्याचे समोर आले होते. आता त्याच्या पुढे जात चक्क सुशिक्षित, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ महिला अधिकारीही खरातच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. अमावस्येच्या रात्री काही बड्या राजकीय नेत्यांनीदेखील खरातच्या कोटींच्या महालात हजेरी लावल्याची माहिची समोर आली आहे.
हेही वाचा- Ashok Kharat Scandal : धक्कादायक! उच्चपदस्थ महिला अधिकारी अशोक खरातच्या दरबारात लावयच्या हजेरी; पोलीस तपासात हादरवून टाकणारे खुलासे
2012 मध्ये अशोक खरातने कोट्यवधी रुपयांवर आपला 'तृप्तबाला' नावाचा बंगला बांधला. खरातच्या दरबाराबाहेर अमावास्येच्या रात्री महागड्या गाड्या उभ्या असायच्या तसेच अनेक राजकीय नेते आणि बडे अधिकारी खरातच्या कार्यालयात न जाता त्याच्या तृप्तबाला या बंगल्यात दबक्या पावलांनी जायचे असा खळबळजनक खुलासा स्थानिक नागरिकांनी केला आहे. बंगल्याच्या आवारात लाखो रुपये किमतीचे दोन विदेशी जातीचे हिंस्र श्वान पाळण्यात आले होते.
त्यामुळे बंगल्याच्या आवारात कोणाचीच जाण्याची हिम्मत होत नव्हती. या श्वानांचा वापर करून खरातने दहशतीचे एक साम्राज्य निर्माण केले होते. यावेळी खरातच्या 'दरबारात' हजेरी लावणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांनी केवळ स्वतःच हजेरी लावली नाही, तर खरातचे रॅकेट वाढवण्यासाठी मध्यस्थाची भूमिकाही निभावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, या महालाच्या गर्भात दडलेली अनेक काळी रहस्ये आता उघड होऊ लागली आहेत.