Amit Shah : राजस्थानमधील चित्तोडगड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विविध विकासप्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटने केली. निंबाहेडा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 21 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तसेच परिसरासाठी 5,959 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या जाहीर सभेत बोलताना अमित शाहा यांनी स्वातंत्र्याच्या 80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उल्लेख केला. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तब्बल 80 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'वंदे मातरम'चे स्वर गुंजले आणि हा क्षण देशातील लाखो नागरिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रगीताचे स्मरण विसरल्याचा आरोप
आपल्या भाषणात शाहा यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. स्वातंत्र्यलढ्यात हजारो देशभक्तांनी लाठ्या-काठ्या, गोळ्या आणि तुरुंगवास सोसताना 'वंदे मातरम'चा मंत्र जपला होता. मात्र, केवळ व्होट बँक आणि मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस पक्ष या ऐतिहासिक राष्ट्रगीताचे महत्त्व पार विसरून गेल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात 'वंदे मातरम' गायन सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ते मध्येच थांबवण्यास सांगितल्याचा दावा शहा यांनी केला. टीव्हीवर संपूर्ण देशाने हा प्रकार पाहिल्याचे सांगत त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
140 कोटी जनता या पापाबद्दल काँग्रेसला माफ करणार नाही
सोनिया गांधी यांना थेट संबोधित करत गृहमंत्री म्हणाले की, देशातील 140 कोटी जनता या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे आणि या कृत्याबद्दल देश काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अजरामर रचनेचा असा अर्धवट त्याग करण्याचा विचारही कोणी कसा करू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेत्यांनी हात जोडून बंकिम बाबूंना आणि जनतेला शरण जाऊन माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना काँग्रेसने सर्व दावे फेटाळून लावले असून, राष्ट्रगीत रोखण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसून गाण्याचे पूर्ण गायन करण्यात आल्याचा दावा केला आहे.