नवी दिल्ली : दिल्ली आणि बिहारमधील निवडणुकांत मोठा विजय मिळाल्यानंतर आता अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी (BJP) ने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी वेगाने सुरू केली आहे. पक्षाचे प्रमुख रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे अमित शाह आता थेट मैदानात उतरून संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहेत. यासाठी ते 28 डिसेंबरपासून निवडणूकपूर्व रणनीतीचे दौरे सुरू करत असून, पक्षाला ज्या राज्यांत सत्ताबदल घडवायचा आहे, तेथे संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
BJP सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अमित शाह यांनी पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या चार राज्यांसाठी आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विशेष रणनीतीची रूपरेषा तयार केली आहे. या चारपैकी तीन राज्यांत सध्या NDA बाहेरील सरकारे सत्तेत असल्याने, या राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार, 28 आणि 29 डिसेंबरला आसाम, 30 आणि 31 डिसेंबरला पश्चिम बंगाल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडू आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात केरळ असा अमित शाह यांचा दौरा ठरवण्यात आला आहे. निवडणुका होईपर्यंत दर महिन्याला किमान 2 दिवस या राज्यांत मुक्काम करून निवडणूक व्यवस्थापनावर थेट लक्ष ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
या दौऱ्यादरम्यान अमित शाह संघटनात्मक बैठका, पन्ना प्रमुखांशी संवाद आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यावर भर देणार आहेत. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, बूथ पातळीवरील संघटन बळकट करणे आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित रणनीती तयार करणे, हा या दौर्यांचा मुख्य अजेंडा असेल.
BJP सूत्रांनी सांगितले की, बिहारमध्ये NDA ला मिळालेल्या प्रचंड यशामागे अमित शाह यांची सूक्ष्म नियोजन क्षमता आणि राज्यनिहाय आखलेली रणनीती कारणीभूत ठरली. विरोधकांनी Special Intensive Revision (SIR) संदर्भात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला, तरीही NDA ने प्रभावीपणे निवडणूक जिंकली, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे.
एकूणच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह यांनी आक्रमक आणि संघटन-केंद्रित रणनिती आखली असून, बिहारमधील यशाचा फॉर्म्युला इतर राज्यांतही राबवण्याचा BJP चा प्रयत्न आहे. पुढील काही महिन्यांत या दौर्यांचा राजकीय परिणाम संबंधित राज्यांच्या निवडणूक समीकरणांवर कसा होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.