ZP School Controversy: महाराष्ट्रातील शासकीय शाळांमधील दुरवस्थेचे पितळ उघडे पाडण्याच्या मोहिमेवर निघालेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विनापरवाना घुसखोरी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अभिजीत दीपके, स्थानिक कार्यकर्ते अजिंक्य शिंदे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा तपासणीच्या नावाखाली केलेल्या या कारवाईमुळे राजकीय व शैक्षणिक वर्तुळात मोठे वादळ उठले आहे.
शिक्षकांना धमकावणे आणि बदनामीचा आरोप
शाळेतील 53 वर्षीय शिक्षिका सय्यद समशाद बानो खैरात अली यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास दिपके आणि त्यांच्या समर्थकांनी वर्गात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना विविध प्रश्न विचारत शैक्षणिक कामकाजात व्यत्यय आणला. तसेच, शाळेची नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने इतर शाळेतील विद्यार्थ्यांना येथे आणून बसवल्याचा बनाव रचल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिक्षकांना आक्षेपार्ह शब्द वापरत 'तुम्हाला निलंबित करायला लावतो' अशी थेट धमकी दिल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा – Pune News: ‘माझा राजकारणासाठी वापर करू नका…’; COEP विद्यार्थिनी संपदा बडेचं थेट राहुल गांधींना आवाहन
चित्रीकरण अन् कायदेशीर कारवाईचा बडगा
शाळेतील संपूर्ण प्रकाराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले. यापूर्वीही दीपके यांनी याच शाळेतील अस्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांवरून मुख्याध्यापकांना जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र, यावेळी प्रशासकीय परवानग्या धाब्यावर बसवून दादागिरी केल्याचा ठपका ठेवत औसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 132, 329(3), 351(2), 356(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. औसा पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.