मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स पोस्ट करत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. “मुंबईत जर बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची?”, असा सवाल त्यांनी केला आहे. सीमा सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या गृह मंत्रालय विभागाकडे आहे. त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या यंत्रणाही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
चित्रे पुढे म्हणाले आहे की, जर बेकायदेशीर नागरिक 4 ते 5 भाजपशासित राज्यांमधून निर्धोकपणे प्रवास करून मुंबईत पोहोचत असतील आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका हद्दीत राहत असतील, तर त्या बनावट कागदपत्रांची जबाबदारी कोणाची?, आधार कार्ड जारी करणारी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, पॅन कार्ड देणारे आयकर विभाग आणि मतदार ओळखपत्रांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग या सर्व संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईत बांगलादेशी असतील तर जबाबदारी कुणाची?
सीमा सुरक्षा कोणाकडे? — केंद्र सरकारकडे Ministry of Home Affairs (MHA).⁰CISF, BSF, NIA कोणाच्या अखत्यारीत? — केंद्र सरकार.
इतक्या मोठ्या प्रमाणात ४–५ भाजपशासित राज्यांतून बेकायदेशीरपणे निर्धोक प्रवास करून मुंबईत येत असतील, आणि जर इथले… — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) February 20, 2026
“महापालिका रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन पाहते; ती ना सीमा सुरक्षा दल आहे, ना ओळखपत्र देणारी प्राधिकरण,” असे म्हणत चित्रे यांनी आरोप केला की, केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही भाजपकडून आरोप मात्र महापालिकेवर केले जात आहेत. दरवाजा उघडा ठेवायचा, किल्ली स्वतःकडे ठेवायची आणि घरात कोणी शिरलं की शेजाऱ्याला दोष द्यायचा, अशी उपमा देत त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच एका व्यक्तीला केंद्र सरकारकडून CISF आणि पोलीस सुरक्षा देऊन बाजारपेठांमध्ये ‘बांगलादेशी’ मुद्द्यावर स्टंटबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केला.