राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आजही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. शरद पवारांनी घेतलेल्या त्या सभेमुळे साताऱ्यात चित्रं बदललं आणि उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागवलेला पुन्हा एकदा ही सभा चर्चेत आली आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपुरात होते. यावेळी त्यांनी एकूण सहा सभा घेतल्या. सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच शरद पवारांच्या सभेचा उल्लेख करत आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही असं म्हणत टोला लगावला.
“मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.