Mumbai Sea Level Rise UN Report 2026: पर्यावरणाचा ढासळता समतोल आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यामुळे भारताच्या किनारपट्टीवरील शहरांवर अस्मानी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राचे (UN) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ही 2 मोठी शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. महासागराची पातळी वेगाने वाढत असल्याने दोन्ही शहरांमधील सुमारे 10 दशलक्ष लोकांना आपली घरे कायमची गमावावी लागण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत सुविधा धोक्यात; आर्थिक स्थिरतेला मोठा धक्का
हिमनद्या आणि बर्फाच्छादित डोंगर वितळण्याच्या वाढत्या वेगामुळे समुद्राची पातळी दरवर्षी नवीन उच्चांक गाठत आहे. संयुक्त राष्ट्राच्या 'समुद्र पातळी वाढीशी संबंधित आव्हाने' या अहवालानुसार, मुंबई आणि कोलकात्यातील केवळ निवासी भागच नव्हे, तर विमानतळ, रस्ते, बंदरे आणि अब्जावधी रुपयांची सरकारी व खासगी मालमत्ता समुद्राच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. मियामी, न्यूयॉर्क आणि ग्वांगझू या जागतिक शहरांप्रमाणेच भारतातील या प्रमुख शहरांनाही अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, ज्यामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेला मोठा तडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जलजन्य आजार अन् सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न; 2050 पर्यंत स्थिती अधिक गंभीर होणार
अहवालातील आकडेवारीनुसार, 2014 ते 2023 दरम्यान समुद्राच्या पातळीत दरवर्षी 4.7 मिमी वाढ झाली होती, मात्र 2024 मध्ये हा दर 5.9 मिमीवर पोहोचला. गेल्या 4,000 वर्षांच्या तुलनेत महासागराचे तापमान सध्या सर्वात वेगाने वाढत आहे. किनारपट्टीवर वारंवार येणारे महापूर, पाणी साचणे आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्यामुळे नागरी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येईल. जगातील सुमारे 77 कोटी लोकसंख्या किनारपट्टीच्या प्रदेशात राहते. 2050 पर्यंत महासागराची पातळी वाढण्याचा हा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने वेळेत ठोस उपाययोजना न केल्यास मानवी इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन घडू शकते, असा इशारा अहवालात दिला आहे.