Disha Salian Case: सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका असहाय्य पित्याने आपल्या तरुण मुलीला गमावले आहे, या अत्यंत संवेदनशील भूमिकेतून न्यायालय या प्रकरणाकडे पाहत असल्याचे खंडपीठाने नमूद केले. गेल्या काही वर्षांपासून पोलीस केवळ अपघाती मृत्यूची नोंद (CrPC 174) करून प्राथमिक टप्प्यावरच तपास ताणत असल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. अशा चौकशीला कायदेशीर बंधने असतात आणि त्यात नोंदवलेल्या जबाबांना न्यायालयात ठोस पुराव्याचे मोल नसते, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.
तक्रार असूनही एफआयआर का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची खरडपट्टी
न्यायालयाने सुनावणीदरम्यान थेट सवाल उपस्थित केला की, जेव्हा या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे संशय व्यक्त करणारी तक्रार आली होती, तेव्हा पोलिसांनी रीतसर एफआयआर (FIR) का नोंदवला नाही? रीतसर गुन्हा दाखल करूनच पोलीस एखाद्या घटनेचा सखोल आणि कायदेशीर तपास करू शकतात. पोलिसांनी एप्रिल 2026 मध्ये सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुलीचे वडील अजूनही न्यायालयात आव्हान देऊ शकतात, हे स्पष्ट करत एफआयआर नोंदवून अधिकृत आणि निष्पक्ष चौकशी करण्याचा पर्याय आजही पोलिसांकडे खुला असल्याचे न्यायालयाने बजावले.
राजकीय वादांशी देणंघेणं नाही; केवळ न्यायावर लक्ष केंद्रित
या प्रकरणाला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नांवरही उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत भाष्य केले. विविध राजकीय नेत्यांविरुद्ध झालेल्या आरोपांमध्ये किंवा राजकीय चिखलफेकीत न्यायालयाला अजिबात स्वारस्य नाही. न्यायालय केवळ एका न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित पित्याच्या बाजूने उभे असून, या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक, वैधानिक आणि योग्य पद्धतीने समाप्ती होणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. सतीश सालियन यांनी पोलिसांच्या आजवरच्या ढिसाळ तपासावर अविश्वास दाखवत न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमॉर्टमचे निष्कर्ष
दरम्यान, 8 जून 2020 रोजी घडलेल्या या दुर्घटनेनंतर तीन दिवसांनी दिशाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, तिच्या डोक्याला झालेली अत्यंत गंभीर दुखापत हेच तिच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले होते. याव्यतिरिक्त तिचे हात, पाय आणि छातीवर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या तसेच तोंड आणि नाकातून रक्तस्राव झाला होता. तथापि, या अहवालात तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार किंवा अत्याचार झाले नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.