गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना राज्यात काही ठिकाणी सुरु झालेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मान्सूनपूर्व या पावसाने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जवळपास राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. मराठवाडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला. फक्त पाऊसच नाही तर गारपिटीचाही इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. परभणी, धाराशिव आणि धुळे येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरासह जिल्ह्यात पुढील 24 तासांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
तसेच बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. संत्रा बागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात या वादळी वाऱ्याचा जोरदार फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यात देखील मान्सूनपूर्व जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना उकाड्यातून दिलासा दिला आहे. यावेळी हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यासह ग्रामीण भागात रात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. तसेच आज देखील अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा अनुभवायला मिळाला आहे. तर दुसरीकडे, मान्सूनही वेळेत दाखल होऊन खरीप पेरण्या सुरळीत पार पडाव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
तसेच अमरावतीत चार दिवसांच्या खंडानंतर सोमवारी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तावण्यात आली आहे. काल पडलेल्या पावसात शहरात 19 मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. अकोल्यात ही अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे तापलेल्या शहरात पावसामुळे गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही या बदलत्या हवामानाचा आनंद घेतला आहे.