अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागांत हजेरी लावली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण असून, आगामी काळातही पावसाची साथ मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
अशातच मुंबईसह पनवेल, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता नाही. तसेच कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील काही दिवस ढगाळ, दमट आणि काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या ठिकाणी पावसाने विश्रांती असून कोणताही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस ढगाळ, दमट आणि काहीसे कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे समाधानकारक आणि जोरदार पावसासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
विदर्भात हवामानात पुन्हा मोठे उलटफेर जाणवत आहेत. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ परिसरात कुठेही विशेष पावसाचा अलर्ट नसून बहुतांश भागांत पावसाची उघडझाप कायम आहे. पुढील चार ते पाच दिवस ढगाळ, दमट आणि काहीसे कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.