राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून नाशिकसह पुणे, ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये पुढील तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यात कोकण किनारपट्टी, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यावेळी उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हवामान विभागाने तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच शनिवारपर्यंत मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
यावेळी मुंबईत सध्या प्रतितास 44 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत आहेत. दरम्यान, मुंबईला हवामान विभागाकडून वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. तर गेल्या 24 तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला. यवतमाळ, नंदूरबार, अकोला, नाशिक, बुलडाणा, अमरातवी, वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला असून आठ धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात चोवीस तासात 22.2 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 63.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाअभावी करपू लागलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांना समाधान मिळाले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात अधिक जोर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली गेलेत. आज देखील जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस चांगला सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्याला हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला असून, काल रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल 15 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर झालेल्या या पावसामुळे शेतातील सुकत असलेल्या पिकांना मोठा जीवदान मिळालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा समाधानी दिसतोय. तसेच, सततच्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.