गेल्या काही दिवसांपासून राज्यावर उन्हाचे चटके जाणवत असताना पावसाच्या सरींची देखील चाहूल लागत आहे. उष्णतेनं होरपळून निघत असताना मे महिन्याच्या सुरुवातीला हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत. राज्यात पुढील काही दिवस जळगाव, चंद्रपूर, गडचिरोरी, धुळे, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 38-42 अंशांपर्यंत राहणार असून उष्णतेच्या लाटेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कोकण किनारपट्टीवर मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या भागांत कमाल तापमान 34-38 अंशांवर असून कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळणार आहे.
तसेच पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान 37-40 अंशांवर असून अवकाळीचं संकट उद्भवला जात आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्याचे तापमान सलग चार दिवसांपासून 40 पार गेल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. यामुळे गेल्या सहा दिवसात जिल्ह्यातील बारा प्रकल्पांतील जलसाठा तब्बल 4 टक्क्यांनी घटून सद्यस्थितीत 49 टक्क्यांवर आला आहे.
परिणामी, आगामी काळात धुळेकरांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकसह नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर येथे कोरडे हवामान असणार आहे. छत्रपती संभाजीनगरात आणि विदर्भात माल तापमानाचा पारा 40-43 अंशांपर्यंत राहील. अमरावती आणि अकोला येथे 45.2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहणार असून पुन्हा वादळी पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.