सुरेश कौलगेकर, प्रतिनिधी
मालवण : मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ ही मासेमारी नौका बुडाली आहे. मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे ‘सागरिका’ या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक नौका बुडाली. घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुयोग परब यांना जयदेव लोणे यांच्या नौकेने पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. मात्र दुर्दैवाने नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतदेह सापडले असून या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली 'सागरिका' (आयएनडी एमएच 5 एम एम 1484) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी, मच्छिमार सन्मेष सुरेश परब (वय 49) आणि अक्षय हनुमंत राणे (वय 30) या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुयोग सन्मेष परब (वय 22) या तरुणाला स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूप बाहेर काढले आहे.
एका मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे त्यांची पात समुद्रात पलटी झाली. पात उलटल्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. दरम्यान, सुयोग परब हा पाण्यात पोहत असताना जवळच असलेल्या जयदेव लोणे यांच्या नौकेतील मच्छीमारांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने सुयोगला आपल्या नौकेवर घेऊन त्याचा जीव वाचवला. मात्र, सन्मेष परब आणि अक्षय राणे हे दोघे समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. काही वेळातच सन्मेष परब यांचा मृतदेह किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळून आला. तर थोड्या वेळाने अक्षय राणे यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले. मच्छीमारांनी दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणले असून, शवविच्छेदनासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील आणि करिश्मा चिंदरकर यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच घटनेचे वृत्त समजताच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, तात्या धुरी, नगरसेवक ललित चव्हाण, आना मोंडकर, सुजित मोंडकर, वसंत गावकर, दिलीप पराडकर, आनंद पराडकर, बाबू आचरेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मच्छीमार बांधवांनी किनाऱ्यावर आणि रुग्णालयात धाव घेतली.