Tamil Nadu Cylinder Blast: तामिळनाडूमधील अरियालूर जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक वाराणवासी परिसरात उलटल्याने मोठा स्फोट झाला. ट्रक उलटल्यानंतर काही क्षणांतच सर्व सिलिंडरना आग लागली आणि सलग स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोटांचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला. ज्वाळा एवढ्या तीव्र होत्या की काही काळासाठी रस्त्यावरून जाणारी वाहने थांबली. स्थानिक नागरिकांनी याबाबत तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
चालक जखमी
अपघातानंतर ट्रक चालकाने उडी मारली आणि आपला जीव वाचवला. त्याला किरकोळ दुखापतींसह अरियालूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घ प्रयत्न केले. स्थानिक प्रशासनानुसार, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मोठे नुकसान झाले आहे.
वाहतूक मार्ग बदलला, प्रशासन सतर्क
घटनेनंतर अरियालूरकडे जाणारी सर्व वाहतूक वळवण्यात आली आहे. वाहनचालकांना व्ही. कैकट्टी मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक रहिवाशांना परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली असून पोलिसांनी सुरक्षा तैनात केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. तथापी, सिलिंडर एकमेकांवर आदळल्याने स्फोटांची मालिका सुरू झाली.