Uttar Pradesh News : वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात विध्वंस; आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, नागरिक धास्तावले

उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये वादळामुळे किमान 74 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Uttar Pradesh News : वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात विध्वंस; आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, नागरिक धास्तावले

लखनौ : उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीसह आलेल्या भयंकर वादळामुळे किमान 74 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच या वादळात शेकडो जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. या वादळामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. तापमान ताशी 100 किमी वेगापर्यंत पोहोचलेल्या वाऱ्यासह आलेल्या या अचानक वादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडली असून घरांचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब कोसळले असून जनजीवन विस्कळीत झाले. या वादळाचा फटका उत्तर प्रदेशातील ३६ जिल्ह्यांना बसला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

प्रयागराज हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला असून, पाच तालुक्यांमध्ये मिळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, चार मुले आणि आठ पुरुषांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वादळात जिल्ह्यातील सुमारे 20 जनावरे दगावली असून किमान 16 घरांचे नुकसान झाले. राज्याच्या विविध भागांतून अनेक दुःखद घटनांची नोंद झाली. उन्नावमध्ये, राम आश्रय नावाच्या 70 वर्षीय शेतकऱ्याचा आंब्याचे झाड कोसळून मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत, आसिवानमध्ये निलगिरीचे झाड कोसळून नऊ वर्षांच्या अंशचा मृत्यू झाला. इतर गंभीरपणे प्रभावित जिल्ह्यांमध्ये भदोही (10 जणांचा मृत्यू), फतेहपूर (आठ जणांचा मृत्यू) आणि बदाऊन (सहा जणांचा मृत्यू) यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Pune News : धक्कादायक! रुग्णालय परिसरात बॉम्ब आढळल्याने खळबळ; परिसर सील, वाहतुकीत बदल, नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

वादळामुळे शेकडो विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला. अनेक भागांतील रस्ते बंद झाले, वाहनांचे नुकसान झाले आहे. तर वादळानंतर लगेचच अनेक भागांचा संपर्क तुटला होता. भारतीय हवामान विभागाने लखनौ, प्रयागराज, जौनपूर आणि बांदा यांसह 38 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 60 किमी वेगापर्यंत पोहोचणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने जिल्हा प्रशासनांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हवामान अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, वादळानंतर आणखी एक आव्हान उभे राहू शकते, कारण 15 मे पासून तापमानात मोठी वाढ अपेक्षित आहे. अंदाजानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 6 ते 8 अंश सेल्सिअसने वाढून 45°C ओलांडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number