श्री मार्तंड मल्हारीच्या दर्शनासाठी आले…पण चिमुकली जेजुरीतच राहिली!; पुढे जे घडलं ते ऐकून सारेच चकीत झाले…

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी  जेजुरी : जेजुरीत गुरुवार, 11 जून 2026 रोजी घडलेल्या एका घटनेने काही काळ सर्वांचीच धडधड वाढवली. मात्र जेजुरी पोलिसांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि मानवतेमुळे या घटनेचा शेवट अत्यंत सुखद झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील काही भाविक जेजुरी येथे श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत तीन वर्षांची चिमुकली स्वरांशी प्रभाकर गायके हिचीदेखील […]

श्री मार्तंड मल्हारीच्या दर्शनासाठी आले…पण चिमुकली जेजुरीतच राहिली!; पुढे जे घडलं ते ऐकून सारेच चकीत झाले…

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी 

जेजुरी : जेजुरीत गुरुवार, 11 जून 2026 रोजी घडलेल्या एका घटनेने काही काळ सर्वांचीच धडधड वाढवली. मात्र जेजुरी पोलिसांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि मानवतेमुळे या घटनेचा शेवट अत्यंत सुखद झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील काही भाविक जेजुरी येथे श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत तीन वर्षांची चिमुकली स्वरांशी प्रभाकर गायके हिचीदेखील उपस्थिती होती. दर्शन आटोपून सर्वजण गडावरून खाली आल्यानंतर घाईगडबडीत आजी-आजोबा व इतर भाविक टेम्पोमध्ये बसून पुढील दर्शनासाठी आळंदीकडे रवाना झाले.

दरम्यान, आळंदी येथे पोहोचल्यानंतर  त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत आलेली तीन वर्षांची स्वरांशी जेजुरीतच राहिली आहे. हे समजताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. आजी राहीबाई सुदाम गायके (वय 55) आणि आजोबा सुदाम अण्णा गायके (वय 60) यांच्यासह सर्व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी टेम्पो चालकांनी जेजुरीतील आपले परिचित सुरज चव्हाण यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. त्यांनी मुलीचे छायाचित्र आणि माहिती सुरज चव्हाण यांना पाठविली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरज चव्हाण यांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलगी हरवल्याची माहिती दिली.

दरम्यान, जेजुरीत सोनवणे पार्किंग परिसरातील एका रसवंतीगृहाजवळ ही चिमुकली आढळून आली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वी श्री मार्तंड देव संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सुमारे पाच ते सात वाजेपर्यंत मंदिर परिसरात माईकद्वारे अनेक वेळा मुलीबाबत घोषणा करून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले आणि जेजुरी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर जे घडले ते पोलिसांच्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले.

पोलीस हवालदार निता दोरके यांनी या चिमुकलीला आईच्या मायेने सांभाळले. तिला जेवण दिले, खेळवले आणि धीर दिला. पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिची काळजी घेतली. त्यामुळे घरच्यांपासून दूर असतानाही स्वरांशी सुरक्षित आणि आनंदी राहिली. अखेर रात्री उशिरा आळंदीहून रिक्षाने प्रवास करून आजी-आजोबा जेजुरी पोलीस ठाण्यात पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजता चिमुकली स्वरांशी आपल्या आजी-आजोबांच्या कुशीत परतली आणि उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

जेजुरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनीही या प्रकरणात विशेष सहानुभूती दाखवत आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस कर्मचारी प्रसाद कोळेकर, योगेश चितारे, निता दोरके, उदय पवार, ठाणे अंमलदार तात्यासाहेब खाडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश झगडे उपस्थित होते. या संपूर्ण घटनेत जेजुरी पोलिसांनी केवळ आपले कर्तव्य बजावले नाही, तर मानवतेचेही दर्शन घडवले.  हरवलेल्या चिमुकलीला सुरक्षित ठेऊन तिची चांगली काळजी घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची ही घटना जेजुरी पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारी ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number