Chandgude Family Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसराला सुन्न केले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी जाण्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. कालपर्यंत ज्या घरात हसती-खेळती माणसे होती आणि चैतन्याचे वातावरण होते, तिथे आज अचानक पसरलेली शांतता सुन्न करणारी आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबातील सदस्य कायमचे निघून गेले असले, तरी त्यांच्या मागे राहिलेला 'शेरू' नावाचा लाडका श्वान आजही बंद दाराआड आपल्या माणसांची वाट पाहत आहे.
मुक्या जीवाची अस्वस्थता आणि शेजाऱ्यांचे प्रयत्न
कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे शेरू अत्यंत अस्वस्थ झाला असून तो सतत भुंकत आपल्या मालकांची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत आहे. घरातून कुणाचाही आवाज येत नसल्याने त्याची तडफड पाहून शेजाऱ्यांचाही डोळा भरून येत आहे. बंद घराच्या खिडकीतून त्याला अन्न आणि पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न शेजारी करत आहेत. मात्र, सतत परिचितांच्या आवाजाचा शोध घेणारा हा मुका जीव काय घडले आहे यापासून अनभिज्ञ असून अद्यापही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहे.
हेही वाचा – Pune Tribal Students Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा; नेमक्या काय आहेत मागण्या?
कायदेशीर प्रक्रिया आणि मदतीचे आवाहन
घर बाहेरून बंद असल्याने आणि सुरक्षेच्या कारणामुळे शेजाऱ्यांना थेट आत जाऊन त्याची सुटका करणे शक्य होत नाहीये. अशा परिस्थितीत पोलिसांनी तातडीने पंचनामा करून घराचे कुलूप उघडावे आणि या श्वानाची लवकरात लवकर सुरक्षित सुटका करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या संकटाच्या वेळी प्राणिमित्र संघटना किंवा श्वानप्रेमींनी पुढे येऊन या मुक्या जीवाला सुरक्षित आश्रय आणि आधार द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.