मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची कमतरता असून देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतः महापौरांनी आयुक्तांना पत्र दिलं होतं, त्यानंतर महापौरांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यत झालेल्या महापौरांच्या तुलनेत रितू तावडे यांना अधिक सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहेत.
हेही वाचा- Ritu Tawde Controversy : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं चाललंय काय? घड्याळ प्रकरणानंतर आता लाल दिव्याची गाडी; मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत
रितू तावडे यांच्या सुरक्षेत वाढ
मुंबई महानगर पालिकेत 3 हजार 812 कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात यामध्ये 100 वरिष्ठ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. मात्र, यामधील 40 टक्क्याहून अधिक जागा खाली आहेत. तर पालिकेकडून 2 हजार 600 खासगी सुरक्षा रक्षक सध्या कार्यरत आहेत. पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, रुग्णालय आणि पालिकेशी निगडित इतर विभागांमध्ये हे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. पालिकेत गरज असतानाही सुरक्षा विभागात स्वतःचे कर्मचारी भरण्याऐवजी पालिकेची खासगी सुरक्षा अधिक आहे. तर दुसरीकडे महापौरांनी आयुक्तांना पत्र देऊन सुरक्षा वाढवून घेतली आहे. महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापौर रितू तावडे भेटी देत असताना त्यांना सुरक्षेची कमतरता जाणवली, म्हणून सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोलून सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली होती. त्यानंतर स्वतः महापौरांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र देऊन सुरक्षा वाढवून घेतली आहे. आतापर्यत पालिका कार्यालय आणि महापौर निवास वगळून पालिकेच्या नियमानुसार महापौरांना तीन शिफ्टमध्ये तीन सुरक्षा रक्षक महापौरांच्या सोबत तैनात असायचे. मात्र सुरक्षा वाढवल्यानंतर महापौरांना एका शिफ्टला दोन असे तीन शिफ्टला 6 सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत.
महापौर रितू तावडे लाल दिव्याच्या गाडीवरून पुन्हा चर्चेत
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्वीटने मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आधी घड्याळ,मग बदल्यांचं प्रकरण आता लाल दिव्याच्या गाडीवरून मुंबईच्या महापौर रितू तावडे चर्चेत आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकतचं एक ट्वीट शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या विरोधातील दोन बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. यावेळी नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांवर थेट सवाल उपस्थित केला आहे. 2017 मध्ये केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. मात्र तरी देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवर पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. तसेच त्यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर दिवे नसले तरी फ्रंट ग्रिलजवळ लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. महापौरांच्या गाडीवरील हे दिवे आणि नामफलक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.