नाशिक : नाशिकच्या पेठ रोडवरील पिंगळे फार्म आणि सप्तरंग सोसायटी परिसरात रविवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी एक भयंकर घटना दिसून आली. तेथील एका मॅनहोलमध्ये अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मॅनहोलमधून मृतदेह बाहेर काढला. तर पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने तसेच चेहरा विद्रूप झाल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेचा तपास म्हसरूळ पोलीस करत असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
नाशिक शहर आणि परिसरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत मृत्यू पावलेल्या सहा नागरिकांच्या वारसांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत जितेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे, प्रभाकर साहेबराव निकम, उज्वला शांताराम गायकवाड, दिपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर आणि मासुम भिकन शाह यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.