नागपूरच्या फारूकनगर येथील तीन मुले खेळता खेळता शनिवारी दुपारी बेपत्ता झाली. दिवसभर शोध घेऊनही ती सापडली नाहीत. तर, पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगर येथून बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. घराजवळ उभ्या असलेल्या जुन्या कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुले खेळत असताना कारमध्ये बसली आणि दरवाजा आतून लॉक केला. तिघांचाही उष्माघात आणि गुदमरून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि पोलीस बल मोठ्या संख्येने तेथे पोहोचले.
तौफिक फिरोज खान (४), आलिया फिरोज खान (६) आणि आफरीन इर्शाद खान (६) हे तीनही मुलं शनिवारी दुपारी टेका नाका येथील फारुख नगर मैदानात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. उशिरापर्यंत मुले न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यामध्ये न सापडल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पाचपावली पोलिसांत करण्यात आली. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम सुरू असताना, लोक तिथून जात असताना त्यांना तेथे उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येत होती. यानंतर कार उघडली असता तेथे तीन मुलांचे मृतदेह दिसले. बालकांच्या मृतदेहाची माहिती तातडीने पाचपावली पोलिसांना देण्यात आली.