राज्यात तब्बल ३० हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर आता उमेदवारांना पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल १५ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेत ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, पोर्टलवरील मोठ्या प्रमाणातील लोड लक्षात घेता शिक्षण विभागाने ही मुदत आणखी दोन दिवसांनी वाढवून १३ ऑगस्ट २०२६ केली आहे. दरम्यान, दोन दिवसांची नव्हे तर किमान आठवडाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवार आणि शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना काही उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती व्यवस्थित प्रदर्शित होत नसल्याचेही समोर आले आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने उमेदवार एकाच वेळी लॉगिन करत असल्याने OTP मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षण विभागानेही या तांत्रिक अडचणींची दखल घेतली असून, OTP उशिरा आल्यास उमेदवारांनी घाईने ‘Resend’ पर्यायावर क्लिक करू नये, असे स्पष्ट केले आहे. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही OTP न मिळाल्यास ‘Resend’ पर्यायाचा वापर करावा. तसेच, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत त्यांनी ब्राउझरची History आणि Cache Clear करून पुन्हा प्रयत्न करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास Incognito किंवा Private Window मधून पोर्टलवर लॉगिन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आतापर्यंत ७६,३९४ मुलाखतीशिवाय आणि ५६,२०६ मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र उमेदवारांना आपला पसंतीक्रम नोंदवता आलेला नाही. त्यामुळे केवळ दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसून, तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आठवडाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे शिक्षक भरतीच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.