चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून ५ दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे . ताडोबा व्यवस्थापनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे . १५ एप्रिल २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प बंद करण्यात आला होता . ४ जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध टप्प्यानुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती . त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे ३० जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
प्रकल्पाच्या विविध ६ प्रवेशद्वारावरून २ टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे . तसेच ऑनलाईन बुकिंग प्रणाली बंद राहील . त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे . १ जुलैपासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र बंद असणार आहे . बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी मात्र नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.