अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील प्राथमिक शाळेत अवघ्या 10 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वर्गात पुढे बसलेल्या एका विद्यार्थ्याला फक्त हात लावल्याच्या क्षुल्लक कारणावरुन इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला एका शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मुलाच्या शरीरावर वळ उमटले असून त्याचा श्वासही काही काळ कोंडल्याचे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले आहे.
मुलाला घ्यायला गेली आई; समोरचं दृश्य पाहून
मिळालेल्या माहितीनुसार,सायंकाळी मुलाची आई त्याला शाळेतून घरी घेण्यासाठी गेली असता, मुलगा रडताना दिसला. त्याचवेळी मुलाने शिक्षकांनी आपल्याला काठीने मारल्याचे आईला सांगितले. त्यानंतर मुलाची आई पुन्हा शाळेत गेली आणि संबंधित शिक्षकाला घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. शिक्षकाने,''मला वाटलं मी थोडंफार मारलं असेल,मुलाला एवढं लागलं असेल असं वाटलं नाही''असे असे सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मारहणीनंतर मुलाची प्रकृती पाहून त्याच्या वर्गातील काही मुलांनी त्याला एका शिक्षिकेकडे नेले. त्यावेळी संबंधित शिक्षिकेने मुलाची छाती चोळून त्याला मदत केल्याचे सांगण्यात आले आहे. मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा या स्पष्ट दिसल्यानंतर कुटुंबीयांनी शिक्षकाला फोन करुन लगेत जाब विचारला. त्यानंतर संबंधित शिक्षक त्या मुलाच्या घरी पोहोचला आणि पालकांची माफी मागितली. शिवाय हा घडलेला प्रकार गावात सांगू नये आणि प्रकरण मिटवून टाकावे, अशी विनंती केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलेला आहे.
पोलिसांनी कारवाई न केल्यास थेट…
मात्र, कुटुंबीयांनी हे प्रकरण दडपून न ठेवता पाथर्डी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडित बालकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक संदीप कोंडीराम मचे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याबाहेर बसण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.