शिर्डी : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी देश-विदेशातून नेहमीच कोट्यवधींच्या देणग्या अर्पण केल्या जातात. साईभक्तांची श्रद्धा आणि विश्वास याचे हे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आले असून, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय साईभक्त अंकिता पटेल यांनी साईबाबांना सुवर्णमोटूक मुकुट अर्पण केला आहे.
अंकिता पटेल यांनी साईबाबांच्या चरणी सुमारे एक कोटी एक लाख 38 हजार रुपये किमतीचा हा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाचे वजन सुमारे 700 ग्रॅम असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आली आहे. हा मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर विधीवत अर्पण करण्यात आला.
यावेळी भावना व्यक्त करताना अंकिता पटेल म्हणाल्या, “माझी लहानपणापासून साईबाबांवर अढळ श्रद्धा आहे. आयुष्यातील प्रत्येक अडचणीच्या काळात साईबाबांनी मला साथ दिली. आज माझी एक मोठी इच्छा पूर्ण झाली असून, साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा योग आला, याचे मला समाधान आहे.”
शिर्डी साई संस्थानकडे देशातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातून भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या येत असतात. या देणग्यांचा उपयोग साई संस्थानकडून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि भक्तांसाठीच्या विविध सुविधा उभारण्यासाठी केला जातो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
साईबाबांच्या चरणी भक्तांकडून अर्पण होणाऱ्या अशा मौल्यवान देणग्या म्हणजे श्रद्धेचे प्रतीक असून, साईबाबांवरील भक्तांचा अढळ विश्वास यामुळेच शिर्डी हे श्रद्धेचे एक महत्त्वाचे केंद्र ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.