Nandurbar: जेवणानंतर अवघ्या 15 मिनिटांत विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली! शहादा वसतिगृहातील 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबारच्या शहादा येथील समाज कल्याण वसतिगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांची जेवणानंतर प्रकृती बिघडली. अन्नातून विषबाधेचा संशय असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Nandurbar:  जेवणानंतर अवघ्या 15 मिनिटांत विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली! शहादा वसतिगृहातील 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांची जेवणानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणात डाळ-भात, शेवग्याची भाजी आणि चपातीचे सेवन केले होते. मात्र जेवण झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. काही विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा: Washim News : निकाल लागला अन्… घडलं भयंकर! वाशीममध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, बाधित विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रक्तदाबाचा त्रास जाणवत असलेल्या काही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने वसतिगृहातील जेवणाचे नमुने तसेच विद्यार्थ्यांच्या उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार यापूर्वीही करण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: Stolen Unregistered Car Claim: नोंदणी नसलेली नवी कार चोरीला गेल्यास विमा मिळणार का? ग्राहक मंचाचा ऐतिहासिक निर्णय; कंपनीला 5.68 लाखांचा दणका!

घटनेनंतर तहसीलदार संभाजी पाटील, प्रांताधिकारी दीपक गिरासे, पोलीस अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.

या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number