माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, आरोग्य क्षेत्रातील जाणकार माणूस आमच्याकडे आला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच सावंतांना बळजबरीने राजकारणातून दूर करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
डॉ. दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी काम केलं आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी सेवा केली आहे. तर, कोरोना काळातही त्यांनी चागंले काम केले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दीपक सावंत यांनी जानेवारी 2019मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघात निवडणुकीदरम्यान दीपक सावंत यांना डच्चू दिला. त्यामुळे सावंतांना बळजबरीने राजकारणातून दूर करण्यात आलं असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
दीपक सावंत हे उद्धव गटाचे समर्थक आहेत. याआधी उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बुधवारी दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे.