Dadar RTO Action: मराठी न बोलणाऱ्या चालकांवर RTO चा बडगा; दादर स्थानक परिसरात भरारी पथकाची धडक कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) भरारी पथकाने गुरुवारी स्थानक परिसरात अचानक तपासणी सत्र राबवत कारवाईचा बडगा उभारला.

Dadar RTO Action: मराठी न बोलणाऱ्या चालकांवर RTO चा बडगा; दादर स्थानक परिसरात भरारी पथकाची धडक कारवाई

Dadar RTO Action:  मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक प्रशासनाने नियमभंग करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) भरारी पथकाने गुरुवारी स्थानक परिसरात अचानक तपासणी सत्र राबवत कारवाईचा बडगा उभारला. यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषेत संभाषण न करणारे, प्रवाशांशी अरेरावी व उद्धटपणे वर्तणूक करणारे, तसेच परवान्याच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या या धडक मोहीम मुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.

परवाना अटींचे उल्लंघन अन् प्रवाशांशी अरेरावी; आरटीओकडून तपासणी

दादर स्टेशन परिसर हा नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने फुललेला असतो. या भागात अनेक रिक्षा व टॅक्सी चालक प्रवाशांना नकार देणे, जास्त भाडे आकारणे, प्रवाशांशी अरेरावी करणे आणि गाड्यांच्या मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. तसेच, महाराष्ट्रात टॅक्सी व रिक्षा परवान्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक असतानाही अनेक चालक मराठी बोलण्यास नकार देत असल्याच्या बाबी समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आरटीओच्या विशेष पथकाने ही विशेष कारवाई राबवून चालकांचे परवाने, कागदपत्रे आणि भाडेमीटरची कसून तपासणी केली.

टॅक्सी चालकांचा संताप; राजकीय सूडबुद्धीचा लावला आरोप

प्रशासकीय पथकाने अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मोहिमेवर काही टॅक्सी चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ही कारवाई केवळ राजकीय हेतूने प्रेरित असून, सत्ताधाऱ्यांकडून आमचा नाहक छळ केला जात आहे,” असा गंभीर आरोप एका संतप्त टॅक्सी चालकाने माध्यमांशी बोलताना केला. स्थानिक राजकारणासाठी प्रवाशांशी मराठी बोलण्याचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा दावाही या चालकांनी केला. मात्र, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरच कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत वाहनांवर वचक ठेवण्यासाठी मोहीम तीव्र करणार

स्थानक परिसरातील अवैध वाहतूक, अनधिकृत गाड्या आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर पूर्णपणे वचक निर्माण करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. जे चालक परवान्याचे नियम पाळणार नाहीत, मीटरप्रमाणे गाडी चालवणार नाहीत किंवा प्रवाशांशी असभ्य वर्तन करतील, त्यांच्यावर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. आगामी दिवसांत मुंबईतील इतर महत्त्वाच्या स्थानकांवरही ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number