मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : महापालिकेने जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम रद्द केल्याने अंधेरी पूर्व परिसरात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेच्या 'के पूर्व' विभागातील अंधेरी पूर्व येथील 'बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन आणि सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी दीड हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन एक हजार २०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आउटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त एक हजार २०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार होते; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे काम रद्द करण्यात आले आहे. दुरुस्तीकाम रद्द झाल्याने 'के पूर्व', 'के पश्चिम' व 'पी दक्षिण' विभागातील विविध परिसरातील पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहील, असे पालिकेने कळवले आहे.