राज्यातील सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत आहेत. भाजपा नेते किरीट सोमैया विरोधी पक्षनेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. तर, उद्धव गटाचे खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड सोडत आहेत. अशातच, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. संजय राऊतांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमैया यांचा उल्लेख करत भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच सरकारमधील बाजारबुणग्यांवर कारवाई कधी? असा सवालही राऊतांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
संजय राऊत पत्रात म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवसींनी राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दरम्यान, सरकारमधील बेकायदेशीर कारवायांबाबत कारवाई कारवाई करण्यासाठी मी आपल्याकडे पुराव्यांसह भेट घेऊ इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून मला भेटण्याबाबत टाळाटाळ करीत आहात, असे संजय राऊत म्हणाले.’
महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती.
बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत
त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve pic.twitter.com/0HsVAk02J3 — Sanjay Raut (@rautsanjay61) April 4, 2023
संजय राऊत यांनी पत्राद्वारे आमदार राहुल कुल, दादा भुसे, किरीट सोमैया यांच्या भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली आहे.
भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला. शेतकऱ्यांच्या पैशांची लुटमार झाली असून किमान 500 कोटींचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई होण्यासाठी फडणवीसांची भेट घेऊ इच्छितो.
आमदार दादा भुसे यांनी गिरणा ऍग्रो नावाने 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले आहे. गिरणा कारखाना वाचवण्यासाठी दादा भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाख रुपयांचे शेअर्श फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले.
आमदार किरीट सोमैया यांनी विक्रांत युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. मात्र, राज्यात फडणवीस गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमैयांना क्लीन चीट दिले.
अशा, बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतच्या पैशावर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली आहे.