पुणे : पुण्यात लोहमार्ग पोलिसावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहमार्ग पोलीस अक्षय बंबाळ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. गांजा आणि दारू पिण्याबाबत पोलिसाने टोकल्याचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बंबाळ हे घरी जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी आरोपीने पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणात तीन ते चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. आरोपीच्या कुटुंबीयांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली असून, त्याची आई एसडीपीओ कार्यालयात स्वीपर म्हणून काम करत असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीच्या दारू आणि गांजा सेवनाच्या सवयीवरून त्याची आईदेखील त्याला वारंवार टोकत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्ती कोण आहेत आणि आरोपीने पोलिसावर हल्ला का केला, याचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.