सिंधुदुर्ग: कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, गावाकडचं जीवन आणि मातीतली माणसं जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनेलमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस हे दाम्पत्य महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. मात्र, ऑगस्ट २०२५ मध्ये शिरीष यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धडधाकट असलेल्या शिरीष यांना अचानक गंभीर आजाराने ग्रासलं आणि अवघ्या १५ दिवसांत त्यांचं निधन झालं.
शिरीष यांच्या जाण्यानंतर ‘रेड सॉईल स्टोरीज’चं पुढे काय होणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र, पूजाने खचून न जाता पतीचं स्वप्न आणि त्यांनी उभं केलेलं काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनीही तिला मोठ्या प्रमाणात साथ दिली.
आता शिरीष यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना पूजाने त्यांना अत्यंत भावुक पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. ‘किती आठवावे’ या गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या मनात साठलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या म्युझिक व्हिडीओमध्ये शिरीष आणि पूजाचे जुने क्षण, त्यांच्या लग्नातील आठवणी आणि दोघांनी एकत्र घालवलेल्या सुंदर काळाची झलक पाहायला मिळते. “किती आठवावे तुला मी नव्याने, किती मी तुला रोज शोधीत जावे…” या ओळींमधून पूजाच्या मनातील विरह आणि शिरीष यांच्या आठवणींची तीव्रता जाणवते.
पतीच्या जाण्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, प्रत्येक क्षणी जाणवणारी त्यांची उणीव आणि जुन्या आठवणींमध्ये त्यांना पुन्हा शोधण्याचा प्रयत्न या गाण्यातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ म्युझिक व्हिडीओ न राहता पूजाच्या भावनांचा हळवा प्रवास बनला आहे.
या गाण्याचे गीत तेजस्विनी शिंदेकर यांनी लिहिले असून गायिका अमिता घुगरी आहेत. गीत दिग्दर्शन कौस्तुभ दिवेकर यांनी केलं आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकही भावुक झाले आहेत. शिरीष यांना विसरणं शक्य नसल्याचं सांगत चाहत्यांनी पूजाच्या या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. शिरीषची अपूर्ण राहिलेली स्वप्नं आणि काम पुढे नेण्याचा पूजाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
‘किती आठवावे’ हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना केवळ एका कलाकाराची आठवण येत नाही, तर एका पत्नीने आपल्या दिवंगत पतीच्या आठवणींना दिलेली मनापासूनची मानवंदना अनुभवायला मिळते. पूजाने शिरीष यांच्या स्मृती जपण्यासोबतच त्यांचं स्वप्नही पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.