महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडी झपाट्याने वेग धरत आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा शरद पवारांनी केली होती. त्यावर सर्वांनीच नाराजीचा सूर व्यक्त केला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी झालेल्या समितीच्या निर्णयामध्ये पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला आहे.
लोक माझे सांगाती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा चव्हाण सेंटर येथे पार पडला. या आत्मचरित्र सोहळ्यात राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवार यांनी या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्याचे सांगितले. या दरम्यानच, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचा निर्णयही स्पष्ट केला. त्यांच्या या निर्णयाचा कार्यकर्त्यांना धक्का बसला असून सर्वचजण भावूक झाले होते. कार्यकर्ते, नेते, जनता या सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. पवारांनी निर्णय मागे घेण्याची मागणी सर्व कार्यकर्ते, नेत्यांकडून होत होती. तर, एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्नसुद्धा केला. त्यामळे पवारांची मनधरणी सर्व कार्यकर्ते, नेत्यांकडून होत आहे. दरम्यान, शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एकसंमतीने शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पवार पुढे या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवारांच्या राजीनामा मागे घेण्याबाबत सर्व कार्यकर्ते, नेते एकटवले आहेत. दरम्यान, समितीने पवारांचा राजीनामा फेटाळून लावल्यामुळे कार्यकर्ते, नेते आनंदी झाले असून त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. मात्र, समितीने राजीनामा फेटाळला असला तरी शरद पवारांचा अंतिम निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.