गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड घेतला होता. अशातच दीड महिन्याच्या पावसाच्या खंडानंतर वरुणराजाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. उकाड्याने हैराण नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून यामुळे नागरिकांची तारांबळ उडली आहे. आज महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यावेळी मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या भागांत ढगाळ वातावरण असून कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो.
तर पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या तासाभरापासून सोलापुरात पावसाची संततधार सुरु आहे.
सोलापुरात यंदाच्या पावसाळ्यातील आत्तापर्यंतच्या मोठ्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरातील तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. ज्यामुळे खरीप पिके आधीच पावसाअभावी जळून गेल्याने शेतकरी संकटात सापडले होते. सोलापुरात मुसळधार पावसामुळे शहरात दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही उरले नाही.
मराठवाडा आणि विदर्भातील धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.