नाशिकमधील सिन्नरमध्ये नांदूर शिंगोटे येथे शनिवारी लोकनेते गोपीनात मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. आम्हाला स्मारक नकोय पण ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतीगृह बांधा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मुंडे साहेबांचं स्मारक 2014मध्ये होणार होतं. पण ते झालं नाही. ते का झालं नाही, हे महत्त्वाचं नाही. पण माझी विनंती आहे, तुम्ही साहेबांचं स्मारक बांधुच नका. मात्र, या राज्यात नाशिक, नगर, बीड, पुणे नवी मुंबई यासारख्या महत्त्वाच्या शहरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतीगृह बांधा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.’
तसेच, ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मारक नका बांधू, गोरगरिब आणि वंचितांना उपचार घेण्यासाठी रुग्णालय बांधा. अनेकांनी आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणासाठीचा पैसा गोपीनाथ गडासाठी दिला होता. आता त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या लेकीची आहे. दुर्दैवाने सत्तेत असताना ऊसतोड मजुरांच्या लेकरांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली नाही. परंतु, मुख्यमंत्री शिंदे हे काम करतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.’
गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दादा भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी बडे नेते उपस्थित होते.