नाशिक : नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, आठवडी बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास आणि रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नसणार. शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही 15 दिवसांसाठीच्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. संबंधीत आदेशाचे पत्रक मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केले होते. मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू दिले होते. यामध्ये सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.