सोलापूर : सोलापूर शहरातील लोकमान्य नगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अल्ताफ शेख (वय 45) असे या मृत व्यक्तीचे नाव असून सुफियान शेख हा जखमी झाला आहे. लोकमान्यनगर भागातील तरुणांच्या दोन गटात वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता. याच वादाचे संध्याकाळी जोरदार हाणामारीत रूपांतर झाले. हाणामारीत अल्ताफ शेख जागीच बेशुद्ध झाले होते. उपचारासाठी त्यांना बेशुद्धावस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अल्ताफ यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांच्या नातेवाईकांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गर्दी केली. दरम्यान, याप्रकरणाची सिव्हिल चौकीत नोंद घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.