Nursing Exam Paper Leak: महाराष्ट्रात विविध भरती आणि शैक्षणिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र थांब नाव घेत नाहीये. टीईटी (TET) आणि नीट (NEET) परीक्षांमधील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच आता नर्सिंगच्या परीक्षेतही पेपर फुटीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परभणी येथील एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या महिला पर्यवेक्षिकेनेच स्वतःच्या बहिणीला मदत करण्यासाठी मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो व्हॉट्सॲपवर पाठवल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – रेल्वेतील सूटकेसमध्ये सापडले मृत महिलेचे सडलेले आणि डोके नसलेले अवशेष! भयंकर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट
असा झाला धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड
परभणी शहरातील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूल या केंद्रावर जी.एन.एम. प्रथम वर्षाचा पेपर सुरू होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या राखी चव्हाण यांनी आपल्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि ते तातडीने बहिणीच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिले. केंद्रावर प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याची शंका आल्यानंतर केंद्र निरीक्षकांनी संबंधित पर्यवेक्षिकेची तात्काळ तपासणी केली. तिच्या मोबाईलची कसून पाहणी केली असता, त्यात प्रश्नपत्रिकेचे फोटो आणि व्हॉट्सॲप चॅट आढळून आल्याने या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला.
पाच जणांवर गुन्हा दाखल; चार आरोपींना जामीन
परीक्षा केंद्राची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून नानल पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे, तर एका आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हा फोटो इतर कोणाला पाठवला होता का, याचा शोध घेतला जात आहे.