Beed Firing News: बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील इमामपूर रस्त्यावर असलेल्या सलीम पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेसात वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव सफावन खान असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाल्मीक कराडचा निकटवर्तीय अन् सोशल मीडियावरील रील्स
या प्रकरणातील मुख्य आरोपी सफावन खान हा राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत असलेल्या वाल्मीक कराडचा अत्यंत जवळचा समर्थक मानला जातो. सफावन खान याचे वाल्मीक कराडसोबत चर्चा करतानाचे अनेक व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. इतकेच नव्हे तर, नुकत्याच वाल्मीक कराडच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सफावन खान आघाडीवर राहून नेतृत्व करताना दिसून आला होता. त्यामुळे या गोळीबार प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले असून शहरात पुन्हा एकदा या ‘कनेक्शन’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – Crime News : ‘मी हे जग सोडून चाललेय…’; पायावर संदेश लिहून 31 वर्षीय विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल
आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आलेख आणि अवैध धंदे
गोळीबार करणारा सफावन खान हा भागात स्वतःची दहशत पसरवण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, नागरिकांना धमकावणे आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय, खंडणी वसूल करणे आणि विविध प्रकारचे अवैध धंदे चालवण्यात त्याचा सहभाग असल्याच्या चर्चा स्थानिक स्तरावर जोर धरत आहेत. शहरात स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठीच त्याने हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल, तपासाला वेग
इमामपूर रस्त्यासारख्या गजबजलेल्या भागात रात्रीच्या वेळी झालेल्या या थेट गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता फरार आरोपीचा शोध घेत असून या घटनेमागील मुख्य कारणाचा अधिक तपास करत आहेत.