Non Veg Controversy : दक्षिण मुंबईतील ताडदेव भागात एका अलिशान इमारतीमधील फ्लॅटच्या विक्रीसंदर्भात तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. संबंधित रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी या व्हिडिओमध्ये, हे घर केवळ शाकाहारी व्यक्तींनाच विकले जाईल आणि मांसाहार करणाऱ्यांना दिले जाणार नाही, अशी भूमिका मांडली होती. कॉस्मोपॉलिटीन संस्कृती असणाऱ्या मुंबई शहरात अशा प्रकारच्या अटींमुळे तीव्र असंतोष पसरला आणि मराठी तसेच मांसाहारी नागरिकांवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून नेटिझन्सनी प्रशासनावर व संबंधित एजंटवर जोरदार टीका केली.
मनसेचे आक्रमक आंदोलन आणि पोलिसांची कारवाई
या प्रकरणाचे पडसाद राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही उमटले. मांसाहाराच्या मुद्द्यावरून घर नाकारल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला. मनसे सैनिकांनी थेट भावेश कावरे यांच्या कार्यालयावर जात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आणि कार्यालयाच्या दरवाजावर कोंबडीच्या पायांची माळ टांगली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फ्लॅटमालकाची भूमिका आणि कावरे यांचे स्पष्टीकरण
वादावर स्पष्टीकरण देताना भावेश कावरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. सदर फ्लॅट हा एका मराठी वारकरी कुटुंबाचा होता आणि त्यांची स्वतःची अशी अट होती की घर केवळ शाकाहारी ग्राहकालाच विकले जावे, असा दावा कावरे यांनी केला. अखेर तो फ्लॅट एका मराठी शाकाहारी कुटुंबानेच खरेदी केला असून व्यवहाराची प्रक्रिया जलद गतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे स्पष्टीकरण देऊनही नागरिकांमधील राग शांत झालेला नाही.
राज ठाकरेंशी चर्चा आणि पुढील कायदेशीर पावले
वाद अधिक चिघळल्याने आता भावेश कावरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. रविवारी दुपारी 12:30 वाजता ही भेट होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या भेटीदरम्यान कावरे नक्की काय भूमिका घेतात आणि मनसे अध्यक्ष त्यांना काय सल्ला देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर भावेश कावरे हे 1 वाजेच्या सुमारास कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपला अधिकृत जबाब नोंदवणार आहेत.