Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे सुखावलेल्या बळीराजाची आणि नागरिकांची चिंता आता पुन्हा वाढली आहे. मान्सूनची गती संथ झाल्यामुळे अनेक भागांत उन्हाचा चटका आणि कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने 15 जून रोजी राज्यातील हवामानाचा दुहेरी पॅटर्न जाहीर केला असून, एकूण 12 जिल्ह्यांमध्ये दमट हवामानाचा, तर 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात उकाडा
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रता कमालीची वाढल्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या भागांसाठी उष्णतेचा 'यलो अलर्ट' असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहील, तर नाशिकमध्ये विना-अलर्ट हलक्या सरींची शक्यता असल्याने नागरिकांना संमिश्र हवामान अनुभवायला मिळेल.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुहेरी हवामान
तथापि, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याउलट, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये निसर्गाचे वेगळेच रूप पाहायला मिळेल. येथे ताशी 30-40 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसला तरी अंशतः पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे उन्हाचा कडाका जाणवेल, तर परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोलीमध्ये दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
विदर्भाला वादळाचा तडाखा, अमरावतीत मात्र उष्णता
याशिवाय, विदर्भातील हवामानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यासाठी तीव्र उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने तुफानी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 40-50 किमी या वादळी वेगाने वारे वाहणार असून वीज कोसळण्याच्या शक्यतेसह मेघगर्जना होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
सध्या संपूर्ण राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे वादळी पाऊस असा विचित्र हवामान बदल पाहायला मिळत आहे. हा लहरीपणा पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरण्या न करता कृषी विभागाने दिलेल्या अधिकृत सल्ल्यानंतरच पेरणीच्या कामांना सुरुवात करावी, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.